महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहेत. सातत्याने विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी केली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यासह नवाब मलिक यांनी रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात, असा गंभीर आरोपही केला होता.