Sindhudurg | आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. पोलिसांनी नितेश राणेंना चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी 21 डिसेंबरला नोटीस बजावली होती. त्यानुसार नितीश राणेंची शनिवारी अर्धा तास चौकशी झाली. या चौकशीनंतर आता त्यांना अटक होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांचे पती गोट्या सावंत यांचीही कणकवली पोलिसांनी चौकशी केली आहे.
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.