वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारातील घोटाळ्या प्रकरणी उद्योगपतींच्या कार्यालयावर ईडीची धाड
आज औरंगाबादमध्येही शहरातील उद्योजकांविरोधात ईडीने छापे मारण्याची कारवाई सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यात ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून बड्या नेते आणि उद्योजकांविरोधात धाडसत्र सुरु आहे. आज औरंगाबादमध्येही शहरातील उद्योजकांविरोधात ईडीने छापे मारण्याची कारवाई सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून औरंगाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली आहे. अजूनही ही कारवाई सुरु असून लवकरच यातील अधिक माहिती अधिकाऱ्यांकडून उघड केली जाईल. शहरातील विविध सात स्थळांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. यात नक्षत्रवाडी परिसराचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ही धाड पडल्याची माहिती प्राथमिक स्तरावर हाती आली आहे. मात्र कोणत्या दोन उद्योजकांविरोधात ही कारवाई सुरु आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.