चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याची एकनाथ खडसे यांच्याकडून पाठराखण, केलं मोठं वक्तव्य
VIDEO | महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? आता एकनाथ खडसे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याचं समर्थन
जळगाव : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य केलं. तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी वेगळं विधान केलं. यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याचं समर्थन करत सहमत असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली आहे. राम जन्मभूमी आंदोलनात शिवसैनिकांचा कमी संख्येत सहभाग होता, असं स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी मांडलं आहे. “राम जन्मभूमी आंदोलनात किती शिवसैनिक होते हा विचार करण्यासारखा विषय आहे. बाबरीचा ढाचा आम्ही पाडला हे म्हणण्याचं धैर्य भाजपमध्ये नव्हतं. होय, बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरेंनी दिली. बाबरी मशिदच्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. या प्रकरणात पंधरा दिवस तुरुंगवासासह पोलिसांकडून मला मारहाण झाली. त्यावेळी शिवसेनेचे जे मंत्री आले ते सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आले”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं.