दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले; ‘मी काळजीवाहू मुख्यमंत्री, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश…’
“आम्ही सकारात्मक आहोत. काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे सगळ्यांची काळजी मी घेतो आहे. आजही मी खूश आहे. लाडकी बहीण महत्वाची योजना आहे. सरकारवर जनता खुश आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. अशातच काल रात्री दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्रिपदी कोण होणार यावर शिक्कामोर्तब केले. ही बैठक अटोपून एकनाथ शिंदे पहाटे चार वाजता, देवेंद्र फडणवीस २. ४५ मिनिटांनी तर अजित पवार हे तीन वाजता मुंबईत दाखल झालेत. काल झालेल्या बैठकीनंतर आज महायुतीची मुंबईत बैठक होणार असून त्यात मंत्रिपद ठरणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. शिंदे म्हणाले, ‘आज आमची पहिली बैठक झाली. उद्या पुन्हा बैठक होईल. या बैठकीत महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होईल. तसेच मंत्रिमंडळावरही चर्चा होईल. उद्या मुंबईत बैठक होईल. आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह आणि जे.पी.नड्डांसोबत बैठक झाली. या बैठकीला आम्ही तिघेही उपस्थितीत होतो. आजच्या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा झाली आहे. आमच्यात समन्वय आहे. मी कालच माझी भूमिका सांगितली.’