Vijay Shivatare : मंत्रिमंडळातून पत्ता कट होताच विजय शिवतारे भडकले, ‘आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नको’
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकूण ११ मंत्र्यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ ग्रहण केली. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्याने पुन्हा मंत्रिपदासाठी वर्णी लागेल अशी आशा असलेल्या बड्या नेत्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले.
नुकताच काल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नागपुरात झालेल्या मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात महायुतीतील एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकूण ११ मंत्र्यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ ग्रहण केली. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्याने पुन्हा मंत्रिपदासाठी वर्णी लागेल अशी आशा असलेल्या बड्या नेत्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांसारख्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने या नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अशातच विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ‘माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही. मला लोकांनी निवडून दिलं आहे त्यांची कामं करणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’, असे विजय शिवतारे म्हणाले. तर मंत्रिमंडळातून नाव कट झालं याचं दुःख नाही तर विश्वासात न घेता मंत्रिमंडळ विस्तार झाला याचं दुःख असल्याचे शिवतारे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, आता आडीच वर्षांनी जरी मला मंत्रिपद मिळालं तरी मी घेणार नाही असं म्हणत शिवतारे यांनी नाराजी व्यक्त करत खंत व्यक्त केली.