शेतकऱ्यांचं लाल वादळ पुन्हा रस्त्यावर उतरणार, आता कोणत्या मागण्या?
VIDEO | किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी लाँगमार्च निघणार, आता कोणत्या मागण्यांसाठी शेतकरी वर्ग उन्हा-तान्हात रस्त्यावर उतरणार?
अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून शेतकऱ्यांचं लाल वादळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी असा लाँगमार्च काढण्यात येणार असून आज दुपारी ३ वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या या मोर्चाचे लोणीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. असे असले तरी सकाळपासूनच राज्यातील विविध भागातून शेतकरी आणि आदिवासी बांधव अकोले येथे जमण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. तीन दिवसात हा लाँगमार्च लोणी येथे पोहचणार असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यलयावर धडकणार आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांनी अद्यापही परवानगी दिलेली नसली तरीही मोर्चेकरी जमण्यास सुरूवात झाली आहे. कालची झालेली बैठक केवळ फार्स असून आमच्या मागण्यांसाठी हा लढा सुरू राहणार असल्याचे डाँ. अजित नवले यांनी म्हटले आहे. तर खारघरच्या दुर्घटनेनंतर खरंतर सरकारने दुपारी सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास आणि आंदोलनास मनाई केलेली आहे.. आज हा मोर्चा दुपारी तीन वाजता निघणार असून भर दुपारी लोक जमणार आहेत. मात्र आम्ही सगळी काळजी घेत असून इतर पक्षीय नेत्यांप्रमाणे आम्ही एसीमध्ये आणि आंदोलक रस्त्यावर असं होणार नसल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे.