वळसे पाटलांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं चार दिवसांपासून उपोषण, दिला थेट आत्महत्येचा इशारा
गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर उपोषण सुरू ठेवणार, असल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुण्यातील मंचर येथील घरासमोर शेतकऱ्यांचे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, कोणताही गैर प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. ‘फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या सरकाने बंद करून महात्मा फुले योजना सुरू केली. गेली सात वर्षे झाले मात्र शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजना मधील 70 टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला मात्र अजूनही 30 टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत’, असे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जर सरकारने आम्हाला कर्जमाफी दिली नाही तर मंचर येथे विष प्राशन करून आत्महत्या करणार असल्याचा टोकाचा इशाराही शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.