Rahul Bajaj Passes Away : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं आज निधन झालंय. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय
मुंबई : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं आज निधन झालंय. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बजाज समूहाच्या उभारणीमध्ये (Bajaj Group) राहुल बजाज यांचे मोठे योगदान आहे. राहुल बजाज यांचा जन्म दहा जून 1938 मध्ये झाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ (mba) देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान मोठे आहे. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा ही नीरज बजाज यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.