‘मला संपवू नका, मी जिवंत…’, अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले, वक्तव्यानं उडाली खळबळ
काँग्रेसला राम-राम करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले आहेत. यानंतर त्यांनी नव्या जोमात नांदेडमध्ये सुरूवात केली. दरम्यान, नांदेडमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं ज्यानं खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. मात्र अशोक चव्हाण यांनी यावेळी केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा होत असून त्याने एकच खळबळ उडाली आहे. “विकासात्मक कामं करण्याच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशोक चव्हाण सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे मी जाहीरपणे सांगतो. या मुद्दावर आपले कुणाशीच काहीच मतभेद नाहीत. पण विरोधक जिल्ह्यात या गोष्टी अशोकरावांमुळे झाल्या नाहीत, त्या झाल्या नाहीत, अशी यादीच विरोधकांनी केली आहे. माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना करमत नाही. मी समजा उद्या नसेलच राजकीय क्षेत्रात तर मग तुम्ही उद्या कुणाला बोलाल? मलाही जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर तुम्ही राहाल. मी संपलो तर तुम्हाला बोलायला काय राहणार नाही. म्हणून मला संपवू नका, मी तुम्हाला नाही म्हणत टीका करणाऱ्यांना बोलतोय,” असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.