Beed Mosque Eid : बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक मोठा आवाज अन्… नेमकं काय झालं?
बीडच्या अर्धामसाला गावातील मशिदीत जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय?
बीड जिल्ह्यातल्या अर्धामसाला गावातली मशिद मध्यरात्री स्फोट झाल्यानं हादरली. दोन जणांनी मशिदीत जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. मशिदीच्या खिडक्या आणि फरश्या सुद्धा तुटल्या. दरवाजे आणि पंख्यांची नासधूस झाली. इतकंच नाहीतर भिंतींनाही तडे गेलेत. स्फोट घडवण्यापूर्वी आरोपी विजय गव्हाणे यांनी जिलेटीनसोबत स्वतःचं रील सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केलंय. याच वेळी गव्हाणे आणि सागडेनं विशिष्ट व्यक्तींना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. गावातल्या ज्येष्ठ लोकांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उरूस संपल्यानंतर सर्वजण घरी गेले. रात्री अडीच वाजेच्या सुमारास मशिदीतून अचानक स्फोटाचा आवाज आला. सय्यद उसमान नावाच्या व्यक्तीनं विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडेला पळून जाताना पाहिलं. स्फोटाच्या आवाजानं गावकरी जागे झाले. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केला आणि दोघांना अटक केली. मशिदीतल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडेला अटक केली. दोघांनाही आता 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर अर्धामसाला ग्रामस्थांकडून सुद्धा सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय.