Pankaja Munde : कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत?
परळीच्या विकासासाठी मी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी आहे. हे दाखवण्यासाठी मी आज आले. मी जात धर्म पाहत नाही. कोणत्याही पक्षाच्या लोकांना त्रास दिला नाही. द्वेष मनात ठेवला नाही. या जिल्ह्यातील लोकांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. त्यामुळे विकास तुमच्या पदरात देणं हे आमचं कर्तव्य असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या
बीड, ५ डिसेंबर २०२३ : बीडमध्ये राज्य सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. पंकजा मुंडे भाषण करत असताना म्हणाल्या, मला मीडियाने विचारलं ताई तुम्ही या कार्यक्रमाला आलात हे प्रमुख आकर्षण आहे का? मी म्हटलं, मंचावर सर्व आमदार आहेत. त्यामध्ये माझा संवैधानिक भूमिका नाही. पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी काम केलं. बीड जिल्ह्यासह परळीची सेवा करताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं मनात वाटायचं. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. तेव्हा या कामाचं बीजारोपण केलं. धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते. तीन वर्ष कोविड होतं. सत्तांतर अडचणी होत्या. आता ही योजना पुढे जाईल. अत्यंत चांगलं काम या माध्यमातून झालं पाहिजे. या वैद्यनाथाचा आशीर्वाद आपल्याला लाभला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तर परळीच्या विकासासाठी मी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी आहे. हे दाखवण्यासाठी मी आज आले. मी जात धर्म पाहत नाही. कोणत्याही पक्षाच्या लोकांना त्रास दिला नाही. द्वेष मनात ठेवला नाही. या जिल्ह्यातील लोकांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. त्यामुळे विकास तुमच्या पदरात देणं हे आमचं कर्तव्य असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.