Ajit Pawar | मीच नियम पाळले नाही तर मी कुठल्या तोंडाने लोकांना सांगणार? : अजित पवार
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. संसर्ग वाढू नये म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जावे असे आवाहन केले जात आहे. मात्र काही मंत्री आणि सरकारी कार्यक्रमांतच नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. संसर्ग वाढू नये म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जावे असे आवाहन केले जात आहे. मात्र काही मंत्री आणि सरकारी कार्यक्रमांतच नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांना टीकेचे धनी व्हावं लागलंय. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. एखाद्या कार्यक्रमाला 50 पेक्षा जास्त लोक असतील तर मी उपस्थित राहणार नाही, अशी माहिती पवार यांनी माध्यमांना दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू नये म्हणून सभा, मेळावे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील काही मंत्री, आमदारच या नियमांना पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे. तसे काही व्हिडीओ माध्यमांनी यापूर्वी सार्वजनिक केलेले आहे. नेत्यांच्या मुलांच्या विवाहसोहळ्यात तर कोरोना नियमांना सर्रासपणे लाथाडण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असलेल्या कार्यक्रमांनादेखील मोठी गर्दी झाल्याची काही उदाहरणे आहे. हाच मुद्दा घेऊन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. कोरोना नियम फक्त सामान्य नागरिकांनाच आहेत का ? असा सवाल भाजपकडून केला जातोय. यामुळे सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे अजित पवार यांनी गर्दी टाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 50 पेक्षा जास्त नागरिक असलेल्या कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचं त्यांनी ठरवलं आहे. एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर आधी किती लोक आहेत, कोरोना नियमांचे पालन होत आहे का ? या बाबी विचारणार आहे; नंतरच कार्यक्रमाला जाणार, असं अजित पवार यांनी म्हटलंय.