उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
'राजकारणात काहीही होऊ शकतं हे खरं आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवू असं वाटलं होतं का? ही वेळ भाजपने आणली. मग भाजपसोबत का जावं. शिवसेनेचं उत्तम चाललं आहे. चार माणसांशी लग्न करायला आम्ही काही....'
मुंबई, १ मार्च २०२४ : उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार? असा सवाल टीव्ही ९ मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात संजय राऊत यांना केला असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे लोकभावनेचा आदर करणारं आहे. राज्याची लोकभावना शिवसेनेच्या पाठीशी आहे. आघात झाले तरी हा माणूस लढतोय असं लोक म्हणतात. ज्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्यांच्यासोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाहीत. उद्धव ठाकरे यांना मी जास्त ओळखतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास उडेल. राजकारणावरचा विश्वास उडेल. आम्ही म्हणजे नितीश कुमार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, का जावं भाजपसोबत. असं काय आहे भाजपमध्ये आहे. काय ठेवलंय. राजकारणात काहीही होऊ शकतं हे खरं आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवू असं वाटलं होतं का? ही वेळ भाजपने आणली. मग भाजपसोबत का जावं. शिवसेनेचं उत्तम चाललं आहे. चार माणसांशी लग्न करायला आम्ही काही एलिझाबेथ टेलर नाही. एलिझाबेथ टेलरने केली होती, असे म्हणत राऊतांनी खोचक टोला लगावला.