Chandrapur | चंद्रपूरच्या वर्णी खुर्द गावात जादूटोण्याच्या संशयातून महिला, वृद्धांना मारहाण
गावातील एका कुटुंबावर जादूटोणा केल्याचा गावकऱ्यांचा संशय होता. त्यामुळे कसलाही विचार न करता गावकऱ्यांनी संगनमत करून या लोकांना भर चौकात दोराने बांधून मारहाण केली. संपूर्ण गाव या सात लोकांवर तुटून पडला होता.
चंद्रपूर : जिल्ह्यातील पहाडी क्षेत्र असलेल्या आणि दुर्गम अशा जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथील ही घटना असून यात सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शांताबाई कांबळे, साहेबराव हुके, धम्मशील हुके, पंचफुला हुके, प्रयागबाई हुके, शिवराज कांबळे, एकनाथ हुके अशी जखमींची नावे आहेत. गावातील एका कुटुंबावर जादूटोणा केल्याचा गावकऱ्यांचा संशय होता. त्यामुळे कसलाही विचार न करता गावकऱ्यांनी संगनमत करून या लोकांना भर चौकात दोराने बांधून मारहाण केली. संपूर्ण गाव या सात लोकांवर तुटून पडला होता. यात हे सातही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आता चंद्रपुरात उपचार सुरू आहेत. केवळ गैरसमजातून आणि अंधश्रद्धेपोटी ही मारहाण झाली.