Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या घराची वाढवली सुरक्षा, काय आहे कारण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असून घर जाळण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या घरांच्या सुरक्षेत वाढ, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने छगन भुजबळ यांच्या घराला पोलीस छावणीचं स्वरुप
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलनं केली जात आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर बीडच्या माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असून घर जाळण्यात आले आहे. इतकेच नाहीतर त्यांच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली. त्यामुळे अनेक नेत्यांची घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अशातच राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर त्यांना अनेक धमक्यांचे फोन देखील मराठा समजातून आले होते. मात्र आता या समाजाच्या भावना तीव्र झाल्याने राजकीय नेत्यांच्या घरांवर होणारे हल्ले लक्षात घेता ही सुरक्षा वाढवण्यात आलीये.