जिल्ह्याला सहा दिवस पोलीस अधीक्षक नसणं ही गंभीर बाब- मनीषा कायंदे
जिल्ह्याला सहा दिवस पोलीस अधीक्षक नसणं ही गंभीर बाब आहे. संवेदनशील घटना घडल्यानंतर त्वरित पोलिसांकडून कारवाई होण्यासाठी पोलीस अधीक्षक असणे आवश्यक असते, असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं.
नागपूर: भंडारा जिल्ह्यात सहा दिवस पोलीस अधीक्षक नव्हते. आधीचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव (Vasant Jadhav) यांना शिंदे गटाचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तिथून हटवले होते. नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक होण्याच्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली. कदाचित पोलीस अधीक्षक राहिले असते तर ही घटना अशा वळणावर गेली नसती. घटनेच्या तपासात दिरंगाई झाली नसती. जिल्ह्याला सहा दिवस पोलीस अधीक्षक नसणं ही गंभीर बाब आहे. संवेदनशील घटना घडल्यानंतर त्वरित पोलिसांकडून कारवाई होण्यासाठी पोलीस अधीक्षक असणे आवश्यक असते, असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं. भंडारा–गोंदियातील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मेडिकल रुग्णालयात भेट घेतली. पीडितेवर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीषा कायंदे म्हणाल्या, सामूहिक बलात्कार पीडितेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या का अशी आम्हाला शंका वाटते. शिवसेनेतर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचे होती. तीसुद्धा आम्हाला पीडितेच्या कुटुंबीयांना देऊ दिली नाही असंही त्या यावेळी म्हणाल्या.