आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभांची रणधुमाळी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण येथील शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांची प्रचारसभा पार पडली. यापूर्वी विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदेंनी छोटेखानी भाषण करत महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. ‘कार्यालयाच्या उद्घाटनाला इतके लोक असतील तर प्रचाराला किती असतील, याचा तुम्ही विचार करा. समोरच्याचे डिपॉझिट नक्कीच जप्त होणार आहे’, असा विश्वास व्यक्त केला. तर यावेळी ‘लाडकी बहीण’ योजनांचा उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. शिंदे उपस्थित महिला वर्गाला बघून म्हणाले, “लाडक्या बहिणी इथे आहेत, आता त्यांना भाऊबीज दरवर्षी नाही तर दर महिन्याला मिळणार आहे. विरोधक सतत लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मागे लागले आहेत. विरोधी पक्षांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्नही केला आहे. ते सतत मला जेलमध्ये टाकायच्या मागे लागले आहेत. या लाडक्या बहिणींसाठी मी एक वेळा नाही तर दहावेळा जेलमध्ये जायला तयार आहे, असं म्हणालेत.