Karuna Sharma | करुणा शर्मा यांना जामीन मंजूर, चार्चशीट दाखल होईपर्यत अंबाजोगाईत येण्यास मनाई
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर करुणा शर्मा यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने दिला. मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत शर्मा यांना परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात येण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.