नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठी कॅगचा अहवाल, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट?
VIDEO | कॅगच्या अहवालात केंद्रातील सहा योजनांसह नितीन गडकरी यांच्या खात्यांवर ताशेरे, योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं नमूद तर नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल असल्याचा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | कॅगच्या अहवालात केंद्रातील सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आले असून या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नितीन गडकरी यांचा काटा काढायचा आहे. हे अंतर्गत राजकारण आहे. कदाचित त्यामागची पार्श्वभूमी असू शकते. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरी यांच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होतं. गडकरी यांची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचं. त्यांचं राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर कॅगमध्ये गडकरींच्या खात्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पण पंतप्रधान हे रस्ते समितीचे अध्यक्ष असतात. मग पंतप्रधानांची भूमिक काय हा प्रश्न उपस्थित होतो. केंद्रात मोठा भ्रष्टाचार आहे. आता जे आलं त्यावर केंद्र सरकार काय कारवाई करेल हे पाहणार आहोत, असंही ते म्हणाले.