‘रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत, लोकसभेला जमलं म्हणून आता…’, सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. राठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास पाठिंबा असल्याचे लिहून द्यावे, असे म्हणत थेट सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांना चॅलेंजच दिलं आहे.
रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत, असे वक्तव्य करत विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर रोहित पवारांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास पाठिंबा असल्याचे लिहून द्यावे, असं आव्हानच सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांना दिलं आहे. इतकंच नाहीतर रोहित पवारांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘रोहित पवार विद्वान माणूस आहे. आग लावत तुम्ही महाराष्ट्रात सुटलाय. भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात तुम्ही ठेवलीय. तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे.’,असे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. तर या महाराष्ट्रातून हे आग लावायचे धंदे बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता जमेल ही भावना काढून टाका, अशी कडाडून टीका सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी रोहित पवारांवर केली आहे.