बारामतीत पुन्हा पवार vs पवार सामना रंगणार? आधी नणंद-भावजय, आता सख्खे चुलत भाऊ?
बारमतीमध्ये लोकसभा निवडणुकीत जे घडलं ते विधानसभेलाही घडणार? लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. आधी नणंद-भावजय आणि आता सख्खे चुलत भाऊ आमने-सामने येणार असल्याचे बोलले जात आहे.
बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार सामना रंगताना दिसणार? आधी नणंद-भावजय आणि आता सख्खे चुलत भाऊ आमने-सामने येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दारूण पराभव पत्कारावा लागला. मात्र आता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार लढणार असल्याचे स्पष्ट झालंय. तसं खुद्द अजित पवार यांनीच माध्यमांसमोर सांगितलंय. बारामतीमध्ये अजित पवार निवडणूक लढणार नाहीतर कोण? असा सवाल सध्या चांगलाच चर्चेत आहे. यादरम्यान, अजित पवार यांच्या मुलाची म्हणजेच जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटी देण्याचा सपाटा लावलाय. विविध कार्यक्रमांना हजेरी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि गावातील समस्या जाणून घेण्याचे प्रयत्न सध्या जय पवार यांच्याकडून सुरू आहे.