एकनाथ शिंदेंना धक्का, डोंबिवलीत मोठं खिंडार; माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती ‘मशाल’
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. यामुळे दिपेश म्हात्रे हे नाराज झाले होते. आता डोंबिवलीतील ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यतील पक्षात सध्या इन्कमिंग आणि आऊटगोईंट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करत हाती मशाल घेतली आहे. शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात आज प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली. दिपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.