मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या आहेत. या आश्वासनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दलही मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू असताना या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दरम्यान, कोल्हापुरात नुकतीच महायुतीची एक प्रचारसभा पार पडली यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला निवडणुकीपूर्वी १० आश्वासनं दिलीत. या आश्वासनांमध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी प्रतिमाह २१०० रुपये देणार, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेचे पैसे १२ हजारांवरून १५ हजार रुपये करणार, प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी, वृद्ध पेन्शनधारकांना १५०० रूपयांवरून २१०० रुपयांची मदत करणार, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार, ४५ हजार पाणंद रस्ते बांधणार, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन, वीज बिलात ३० टक्के कपात करणार आणि शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार अशा मोठ्या घोषणा एकनाथ शिंदेंकडून कऱण्यात आल्यात.