शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडोबांमुळे खेळखंडोबा पण यंदा काय होणार?
2019 नंतर 2024 मध्येही शिवसेना-भाजपात जागांचा वाद आणि बंडखोरीचे सूर उमटू लागले आहेत. भाजपनं 99 जणांच्या पहिल्या यादीत शिवसेनेच्या वाट्यातल्या 3 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता सुरु झाली आहे.
भाजपकडून 99 जणांची यादी जाहीर झाल्यानंतर 5 जागांवर शिंदे आणि भाजपात वाद सुरु झाले आहेत. धुळ्यात भाजपने उमेदवार घोषित केल्यामुळे शिंदे गटाच्या इच्छूकाने अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. तर ठाणे आणि कल्याणमधल्या भाजप उमेदवारांना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. 2019 नंतर 2024 मध्येही शिवसेना-भाजपात जागांचा वाद आणि बंडखोरीचे सूर उमटू लागल्याचे दिसतेय. धुळे शहर विधानसभा युतीत शिवसेनेकडे होती. यंदा तिथं भाजपनं अनुप अग्रवालांना तिकीट दिल्यानं शिंदे गटाचे इच्छूक मनोज मोरे आणि सतिश महाले नाराज झालेत. यापैकी मनोज मोरेंनी मनोज जरांगेंची भेट घेत पाठिंब्याची मागणी केलीय. तर वर्ध्यातली देवळी विधानसभा शिवसेना लढवत होती. यंदा तिथं भाजपनं राजेश बकानेंना तिकीट दिल्यामुळे शिंदे गटातील इच्छूक नाराज आहेत. नालासोपाऱ्याचीही जागा महायुतीत शिवसेना लढवत आलीय, पण यंदा भाजपनं राजन नाईकांना उमेदवारी दिल्यामुळे शिंदे गटाचे नवीन दुबे अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातच दोन जागा अशाही आहेत, ज्या भाजपच्या वाट्याला असल्या तरी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास शिंदे गटानं नकार दिलाय. कल्याण पूर्व विधानसभेत भाजपनं सुलभा गायकवाडांना तिकीट दिलं. सुलभा गायकवाड या भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी आहेत. तर दुसरा वाद ठाणे शहरात भाजपनं उमेदवारी दिलेल्या संजय केळकरांवरुन सुरु आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट