RBI 2000 Rupee Note | दुसऱ्यांदा नोटबंदी, दोन हजारांच्या नोटा वितरणातून होणार बाद; मुख्यमंत्री एका वाक्यात म्हणाले…
VIDEO | दोन हजारांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजाराच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी आरबीआयने दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत. मात्र या नोटा अद्याप अवैध ठरवल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांनुसार, देशातील सर्वसामान्यांना 23 मे ते 20 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत आपल्याकडे असलेल्या 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा किंवा बदलून घ्यावं लागणार आहे. अर्थात तो पर्यंत दोन हजाराच्या नोटा या चलनात असतील आणि व्यवहारही होऊ शकतील, असं आरबीआयकडून नागरिकांना सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बाजारात फार दिसत नव्हत्या. अगदी कमी प्रमाणात या नोटा दिसत होत्या. अखेर या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो विचारपूर्वक आणि काही विचाराअंतीच घेतला असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.