आता देशी गाय ‘राज्यमाता’, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
राज्यातील शिंदे सरकारने गायीला राज्य माता- गोमातेचा दर्जा घोषित केला आहे. मानवी आहारातील दूधाचं महत्त्व, आयुर्वेद चिकित्सेतील पंचगव्याचं महत्त्व, जैविक शेतीसाठी शेण आणि गोमूत्राचं महत्त्व पाहता गायीला राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने गायीला राज्य माता- गोमातेचा दर्जा घोषित केला आहे. शिंदे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे विविध हिंदू संघटनांनी स्वागत केलं आहे. राज्य सरकारने गाईंना राज्यमाता दर्जा दिल्याने विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गायींना आता संरक्षण प्राप्त होईल. गेली अनेक वर्षे या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती, मागणीला यश आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आणि तसा जीआरही काढण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यात देशी गायींमध्ये घट होत आहे. त्याबद्दलही या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.