विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होतेय तर या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडे स्वतःचे 103 तर अपक्ष आणि इतर 8 असे 111 आमदार आहेत. त्यामुळे 23 कोटा असल्याने 4 आमदार सहज निवडणून येतील. पण पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला चार मतांची गरज असल्याने लहान घटक पक्षातील नेत्यांच्या मताला मोठी किंमत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे विधानभवनात दाखल झाले आहेत. तर त्यांचं मत नेमकं कुणाला मिळणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजू पाटील हे महायुतीला पाठिंबा देणार यात शंका नाही पण महायुतीतील कोणत्या उमेदवाराकडे राजू पाटील यांचा कौल असणार यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे. आज सकाळी 9 वाजेपासून विधानपरिषदेचं मतदान सुरू झालं असून सव्वा 12 वाजेपर्यंत 222 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे.