जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन; सोलापुरात आरोग्य सेवेवर परिणाम
सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास बाराशे कर्मचारी कालपासून संपात सहभागी आहेत. त्यामुळे व्हीलचेअर, स्ट्रेचर ढकलण्यापासून सर्व काम रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागत आहेत. दुसऱ्या दिवशीही हे सर्व कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. हे एकत्रित येऊन शासन विरोधात घोषणाबाजी करत आहेत.
सोलापूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. आरोग्य कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असून त्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ सोलापूरच नाही तर उस्मानाबाद, लातूर शिवाय कर्नाटकातून देखील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. आज सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 350 स्टाफ नर्स, 110 कर्मचारी, 110 क्लार्क आणि शिपाई संपात सहभागी झाले आहेत. “आम्ही कालपासून कामकाजावर बंदी घातली आहे. त्यामुळे रुग्णालयातील 23 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. रुग्णांचे जे काही बरे वाईट होईल त्याला प्रशासन आणि शासन जबाबदार असेल. कोरोना काळात केवळ परिचारिका सेवा देत होत्या. त्यावेळी आम्हाला वाढीव भत्ता देण्याचे आश्वासन दिले मात्र भत्ता दिले नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नाही”, अशी प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.