ठाणे, 28 जुलै 2023 | मागील 24 तासाहून अधिक काळ कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेत हाहाकार माजला आहे. वालधुनी नदीने नदीपात्र सोडून शिवाजीनगर वालधुनी परिसरात नदीचे पाणी शिरल्यामुळे या भागातील जवळपास आठशेहून कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे तर विठ्ठलवाडी नाला रेल्वेचा नाला खडेगोळवली नाला या तीन नाल्यातून सांडपाणी आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने धाव घेत या नागरिकांचे जवळच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण केले आहे.
दरम्यान कल्याण पूर्वेतील निम्म्याहून अधिक भाग पाण्याखाली गेल्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड हे मध्य रात्री पूर परिस्थिती ठिकाणी जाऊन त्या परिसरातील नदी व नाल्याची परिस्थिती पाहत या पूर परिस्थितीला पालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे. प्रशासनाकडून नालेसफाई करताना नाल्यातील गाळ काढला जात नसल्याने हे नाले ओवर फ्लो होत नागरिकांच्या घरात पाणी शिरत नागरिकांचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच दरवर्षी निर्माण होणाऱ्या या पूर्व परिस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने नाल्याला संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.