Maharashtra weather Update : बळीराजासाठी पुढील 2 दिवस चिंतेचे… पुन्हा अवकाळीचं सावट, हवामान खात्याचा अंदाज काय?
राज्यात उन्हाचा ताप कायम आहे. तर, दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले आहे. विदर्भातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील दोन दिवस हे चिंतेचे असणार आहे. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार आहे. अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झालीये. यावल, चोपडा या तालुक्यात गारपीटसह जोरदार पाऊस कोसळलाय. पुण्यातील जुन्नरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर नाशिक जिल्ह्यात अवकाळीने गहू, कांदा, द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. तर दुसरीकडे कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही ४० अंशावरच आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झाली असून ही घट कायम आहे.