जालना, १४ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आज जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला असून आता तुमच्याकडे फक्त 10 दिवस असल्याचे म्हटले आहे. तर आता एक तर विजय यात्रा निघेल नाही तर माझी अंत्ययात्राच निघेल असे म्हणत जरांगे पाटलांना थेट इशाराच सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्यात. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा, या मुख्य मागणीसह जरांगे पाटील यांच्या इतर काही मागण्या आहेत. या मागण्यांमध्ये कोपर्डीतील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी द्यावी, दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्व्हे करा आणि सारथी मार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावावे.