जरांगे पाटलांची तोफ धडाडली, नारायण गडावरून थेट इशारा; ‘आता उलथापालथ करावीच लागेल, पर्याय नाही…’

| Updated on: Oct 12, 2024 | 3:06 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर बीडमधील नारायण गडावरून तोफ धडाडल्याचे पाहायला मिळाले. या सभेतून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मराठ्यांकडून वचनही मागितलं.

‘मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी नाही पाहू शकत. कोणतीही जहागिरदाराची औलाद येऊ दे, आता झुकायचे नाही. कुणालाही पाय लावायचे नाही. कुणावर अन्याय करायचे नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करायला शिका’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपल्याविरोधात षडयंत्र केलं जातंय. आपल्याला डावललं जात आहे. आपल्याला नाकारून टार्गेट केलं जातंय. सावध व्हा. आता त्यांचे डोळे उघडले असतील यांना टार्गेट केलं की संपलं. मला काही मर्यादा पाळायाच्या आहेत. फक्त नारायण गडावर. जर न्याय नाही मिळाला तर तुमच्या लेकरासाठी तुमच्या समुदायासाठी आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे. त्याशिवाय पर्यायच नाही. आपल्या नाकावर टिच्चून जर कुठले निर्णय होत असतील या राज्यातील समाजावर अन्याय होणार असेल तर लेकरांची आणि राज्यातील समाजाची शान वाढवण्यासाठी गाडावच लागणार, असे म्हणत नारायण गडावरून जरांगेंनी थेट इशारा दिला. यावेळी मराठ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी एक शब्दही मागितला, ‘मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे’, असे ते म्हणाले.

Published on: Oct 12, 2024 03:06 PM