Manoj Jarange : ‘…अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील’, असं वक्तव्य करत जरांगेंनी केली मोठी मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या तुरूंगात असताना त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र जेल प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी एकमेकांनाच संपवतील, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी गँगवॉर वाढवून एकमेकांना मारतील, असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात तातडीने खटला चालवा आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
‘वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड कारागृहात मारहाण झाली की नाही? त्यांचं तुरूंगात काय झालं? की फक्त अफवा उठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सोंग करणारे आहेत.’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, हे आरोपी गँगवॉर वाढवतील आणि एकमेकांना संपवून टाकतील. त्यापेक्षा तातडीने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवून या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.