संभाजीनगर, १८ सप्टेंबर २०२३ | गेल्या १७ दिवस उपोषण केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जालन्यात आंदोलनस्थळी उपचार घेतल्यानंतर आता त्यांना संभाजीनगरमधील गॅलेक्सी रूग्णालयात उपाचारासाठी काल दाखल करण्यात आले होते. काल दिवसभर जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले तर काही चाचण्याही करण्यात आल्या. दरम्यान, जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टर म्हणाले, मनोज जरांगे यांनी उपचारांसाठी काल दाखल केल्यानंतर त्यांच्या रक्ताच्या चाचण्या, सीबीसी, किडनी, लिव्हरच्या चाचण्या, कफ असल्याने त्यांच्या छातीचा एक्स रे, ईसीजी देखील करण्यात आली. या केलेल्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट हे नॉर्मल आहेत. मात्र त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. तसेच घशात इन्फेक्शन असल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आलं आहे. तर जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, असे म्हणत संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयातील डॉक्टरांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली.