छत्रपती संभाजीनगर, ६ नोव्हेंबर २०२३ | ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा थेट दावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला इतकंच नाहीतर ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचेही मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. छगन भुजबळ यांनी केलेल्या या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे. जरांगे म्हणाले, ‘ओबीसी आरक्षण संपू शकत नाही कारण आम्ही तिथे आहे. आमच्या वावरात लांबपर्यंत बाण टाकला होता. आम्ही तो अलिकडे सरकवा म्हणतोय तर तुम्ही सरकू देत नाही. इतकाच फरक आहे. आरक्षण आमचंच आहे. यांना द्यायचं नाही म्हणून हे कांगावा करताय.’ तर कोणताही केविलवाणा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही, असेही जरांगे म्हणाले. दरम्यान, मागच्या दारानं आरक्षण देण्याचं काम सरकार करतंय या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. दुकानं अनं दारं त्यांना माहित आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळणार असल्याचा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.