विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. ‘मित्र पक्षांची यादी आली नाही, तर एका जातीवर निवडणूक लढवणं अशक्य आहे. ही आमची माघार नाहीतर हा गनिमी कावा आहे’, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर आंदोलन अद्याप संपलं नसून ते सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली आहे. यामध्ये ते असे म्हणाले, ‘एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नाही, त्यामुळे मराठा उमेदवारांनी अर्ज काढून घ्यावेत. मित्र पक्षांची यादी आली नाही, अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने माघार घेतोय. तर या निवडणुकीत कोणाला पाडाही म्हणणार नाही आणि कुणाला निवडून आणा असंही म्हणणार नाही.’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तर कोणत्याही अपक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही, कोणत्याच जागेवर आमचा पाठिंबा नाही. कोणत्याही दबावापोटी मी हा निर्णय घेतलेला नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे म्हटलं.