शरद पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर अब्दुल सत्तार म्हणतात…
VIDEO | काही नेते अजित पवारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, सामनातील अग्रलेखातून करण्यात आलेल्या दाव्यावर अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांमध्येच अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांनी काय करावं हे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याने सांगण्याची गरज नाही. ते सक्षम आहेत, त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या पक्ष प्रमुखाला असतो आणि तो त्यांनी घेतला आहे. अंतिम निर्णय तेच घेऊ शकतात, मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्याइतका मोठा पुढारी नाही’, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून दिली. तर सामनामध्ये काय छापून आले, त्यापेक्षा माझ्याकडे फारशी माहिती नाही, मी त्याच्यावर बोलणं उचित नाहीत. आमच्या पक्षाचे प्रमुख त्यावर बोलतील, त्यांच्या पक्षातील भाजपमध्ये कोण येणार, त्यांना विचारायला पाहिजे. मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. राजकारणात कुणी कुठे जावं, हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे. मला काहीही चालू शकतं. एकनाथ शिंदे आमचे पक्ष प्रमुख, त्यांना जे चालेल, ते आम्हाला सर्वांना चालेल, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी सामनातील अग्रलेखातून काही नेते अजित पवारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशा दाव्यावर भाष्य केले आहे.