दीपक केसरकर यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट, राजकीय वर्तुळात नेमकं घडतंय काय?
प्रकाश आंबेडकर आणि दीपक केसरकर यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? या भेटीचं कारण नेमकं काय होतं? असे अनेक प्रश्न या भेटीनंतर उपस्थित करण्यात आले होते. यानंतर केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना हे सारं स्पष्ट केले.
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : मंत्री दीपक केसरकर यांनी अचानक वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर आणि दीपक केसरकर यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? या भेटीचं कारण नेमकं काय होतं? असे अनेक प्रश्न या भेटीनंतर उपस्थित करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्यानंतर केसरकर यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. आज संविधान दिन असल्याने प्रकाश आंबेडकर यांना भेटून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो. महाराष्ट्रातील विचारवंतांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे विचार महत्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपण्याकरता आमच्यात समन्वय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.