संजय राऊत यांना हिंदू शब्दाची अॅलर्जी, गिरीश महाजन यांचा पलटवार
संजय राऊतांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागणार; गिरीश महाजनांनी का केली अशी टीका?
संजय राऊत यांच्या डोळ्याला सर्व हिंदुत्वविरोधी दिसत आहे, त्यामुळे संजय राऊत यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागणार आहे, अशी घणाघाती टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. संजय राऊत यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली आहे. संजय राऊत आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या सेनेला हिंदू शब्दाची सुद्धा अॅलर्जी झाली आहे, त्यामुळे त्यांना आलेल्या नैराश्यातून ते कोणतेही विधानं करत आहेत, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा हिंदुत्ववादी मोर्चेकरी, भाजप कुठे होता असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, सगळ्याच महापुरूषांबद्दल भाजपला किती आदर आहे हे कोणीही सांगण्याची गरज नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपने कधीच समर्थन केले नाही. पण स्वतः हिंदुत्वाशी फारकत घेऊन कोणासोबतही गळ्यात गळे घालून फिरत आहात. त्यामुळे हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा संजय राऊत आणि ठाकरे गटाला कोणताही अधिकार नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.