‘संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील, त्यांचं डोकं फिरलंय’; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवरून भरत गोगावलेंचा हल्लाबोल
बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला थेट काही सवाल केलेत यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. या टीकेवर शिवसेना आमदारानं राऊतांना प्रत्युत्तर दिलंय
शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटाते नेते खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये बोलत असताना संजय राऊत म्हणाले, अक्षय शिंदेच्या भोवती एक रहस्यमय पडदा निर्माण झालाय. त्या पडद्यामागचे सूत्रधार अद्याप अदृश्य आहे. का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला? असा सवाल करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना केला. तर ते असेही म्हणाले, एका शिंदेचा एन्काऊंटर शिंदेंनी केला दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करेल. दरम्यान, राऊतांच्या या टीकेवरून भरत गोगावले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांचं डोकं फिरलंय, त्यांना ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल, असे म्हणत आमदार गोगावले यांनी राऊतांच्या टीकेवर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. तर एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर करायला संजय राऊत यांना सात जन्म घ्यावे लागतील.महायुतीला पुन्हा संधी जनता देणार म्हणून संजय राऊत यांच्या पोटात दुखतंय. अक्षय शिंदेने केलेले पाप, कृत्य हे जर बाहेरच्या देशात असता तर त्याला तिथल्या तिथं गोळ्या घालून ठार केलं असतं, असे गोगावले यांनी म्हटले.