Special Report | मुदत संपूनही टोलवसुली का? कोल्हापुरात मनसे कार्यकर्ते आक्रमक
मुंबईतल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन सरकारचे वाभाडे काढले होते. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनीही महाराष्ट्रातल्या रस्त्याच्या प्रश्नांवरुन नाराजी व्यक्त केली होती. काही वर्षांपूर्वी टोलवसुलीच्या मुद्द्यांवरुन मनसेनं आक्रमक आंदोलन केलं होतं. त्यामुळं सरकारला काही टोलनाके बंद करावे लागले होते. आताही राज ठाकरेंनी टोलचा मुद्दा पुन्हा ताजा केलाय. येत्या काही दिवसात मनसे टोलच्या मुद्द्यावरुन पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातल्या किणी टोलनाक्यावरचं आंदोलन ही त्याची सुरुवात होती.
मुंबई : मंगळवारी राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावर बोलले आणि आज कोल्हापुरातले(Kolhapur) मनसैनिक आक्रमक(MNS activists ) झाले. आज सकाळी पुणे-बंगळुरु महामार्गावरच्या किणी टोलनाक्यावर मनसैनिकांनी गर्दी केली. पहिल्यांदा शांततेत सुरु असलेलं आंदोलन नंतर आक्रमक झालं आणि पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली. किणी टोलनाक्याची मुदत संपल्यानं तो टोलनाका बंद करण्याची मागणी मनसैनिकांनी केलीय. किणी टोलनाका गेल्या 17 वर्षांपासून अस्तित्वात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत हा टोलनाका येतो. या टोलनाक्याची 17 वर्षांची मुदत मे महिन्यात संपली आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला पुन्हा 56 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही 56 दिवसांची मुदतवाढ संपून देखील आता जवळपास महिना होत आलाय. कोरोना, नोटबंदी अशी कारणे टोलच्या मुदतवाढीसाठी देण्यात आली होती. आता भूसंपादनाची किंमत वसूल व्हावी यासाठी टोल आकारला जात असल्याचं कारण देण्यात आलंय. मुळात टोल मुदतवाढ देऊ नये अशी मागणी मनसेने केली होती यासाठी दोन वेळा आंदोलन देखील केलं होतं. मात्र त्याची दखल घेतली नसल्याने आज आक्रमकपणे टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं.