‘बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत’, खातेवाटपावर बोलताना मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
हिवाळी अधिवेशात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर दिसतेय. मंत्र्यांनी शपथ घेऊन चार दिवस उलटले तरीही अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही. तर नाराजी नाट्य टाळण्यासाठी खातेवाटपाला उशीर होतोय का असा सवाल सध्या यामुळे उपस्थित होतोय.
गेल्या रविवारी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात पार पडला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १५ डिसेंबर रोजी महायुतीच्या एकूण ३९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. यानंतर आता महायुती सरकारचं खातेवाटप कधी होणार? आणि कोणाला कोणतं खातं मिळणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र हिवाळी अधिवेशात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर दिसतेय. मंत्र्यांनी शपथ घेऊन चार दिवस उलटले तरीही अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही. तर नाराजी नाट्य टाळण्यासाठी खातेवाटपाला उशीर होतोय का असा सवाल सध्या यामुळे उपस्थित होतोय. दरम्यान, शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही दोन दिवसात खातेवाटप जाहीर करू असे सांगितले होते मात्र त्याला अद्याप मुहूर्त लागल्याचं दिसत नाही. अशातच मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावर भाष्य करत महायुतीवर निशाणा साधला आहे. ‘महायुतीतील अंतर्गत कलहामुळे महायुती सरकारच्या खातेवाटपाला उशीर होत असेल. जनतेने मोठ्या प्रमाणात मत देऊन महायुतीला निवडून दिलं. पण तरीही ते जनतेचं समाधान करू शकत नसतील तर जनता विचार करेल. एखाद्या पक्षाला एवढं बहुमत मिळतं की शेवटी तो पक्ष गागंरून गेला असेल’, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी महायुतीवर खोचक टोला लगावला आहे.