आम्ही षंडासारखे गप्प राहणार नाही, आरे केलं तर… मनसेच्या संदीप देशपांडेंचा थेट इशारा
जी घटना घडली ती क्रियेला प्रतिक्रिया होती. एका ठिकाणी क्रिया करायची, पळपुटेपणा करायचा.. नंतर उबाठा नेत्यांनी सावरा-सावर करायची. तुम्हाला न विचारता जिल्हाप्रमुखांनी तो राडा केला का? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उबाठा गटावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा झाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या अडून राज ठाकरेंवर हल्ला करायचा. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. पुन्हा वार कराल, क्रिया कराल तर पुन्हा प्रतिक्रिया दिली जाईल, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी विरोधकांना इशारा दिला. शिवसेना आणि मनसे राज्यातील मोठे पक्ष आहेत. मात्र अशा घटनामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावताय का? असा सवाल संदीप देशपांडे यांना केला असता, ते म्हणाले, संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पण ज्यांनी सुरुवात केली त्यांना संस्कृती जपण्याचा प्रश्न केला का? असे म्हणत त्यांनी माध्यमांनाच प्रतिसवाल केला. काल जेव्हा संजय राऊत म्हणाले, आमचा संबंध नाही तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारलं नाही. प्रतिप्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केले जाताय, असे म्हणत त्यांनी माध्यमांना फटकारलं. आधी किरीट सोमय्या नंतर नवनीत राणा यांच्यावर हल्ला केला. आता आमच्या नेत्यावर हल्ला केला. आम्ही संस्कृती पाळतो आणि आमच्यावर हल्ला केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही. इतकंच काय तर आम्ही षंडासारखे गप्प बरणार नाही. तुम्ही आरे कराल तर आम्ही कारे करू, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी इशारा दिला.