दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी डोंबिवलीच्या फडके रोडवर मनसेचे आमदार राजू पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी टीव्ही ९ शी संवाद साधला. ते म्हणाले, मी शाळा-कॉलेजात असल्यापासून डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी आणि गुढीपाडव्याला येत आलो आहे. येथे येऊन तरुणांशी संवाद साधतो. डोंबिवलीची जी शान आहे ती फडके रोड…या ठिकाणी येऊन आणि आनंद घेत असतो. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केले. यंदाच्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासंदर्भात बोलताना राजू पाटील म्हणाले, मनसेला यंदा चांगलं यश मिळणार आहे. राज ठाकरे यांनी स्वतः असं म्हटले की आम्ही सत्तेत असणार आहेत. तर येणारा काळ हा मनसेसाठी चांगला असणार आहे, असे म्हणत राजू पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. पुढे ते असेही म्हणाले, यावेळेस 100% इंजिन धावणार आहे. पाच वर्ष एकटं रेल्वे इंजिन धावत होतं. पण यावेळेस त्याला डब्बाही लागलेला असेल. त्यामुळे यंदा इंजिन सुसाट धावेल. सगळीकडे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहेच. राज ठाकरे यांची भूमिका लोकांना पटत आहे. या राजकारणाचा चिखल झालेला आहे. ते दुरुस्त करण्यासाठी राजकारणातील शान आणि महाराष्ट्राची संस्कृती परत कशी येईल? यासाठी राज ठाकरे यांनी जाहिरात दिली होती ती लोकांना भावली त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, असं राजू पाटील म्हणाले.