‘निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटले तर नक्की घ्या, कारण…’, राज ठाकरे काय बोलून गेले?
विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या, ना आघाड्या… आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत, असे म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल हे लक्षात ठेवा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटले तर नक्की घ्या, असं मिश्किल वक्तव्य ही त्यांनी केलं. ‘निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष वाट्टेल ते करतील. तुम्हाला जातीत अडकवतील. पैशाचा महापूर आणतील. निवडणुकीत जेव्हा हे पैसे वाटतील. सर्वच राजकीय पक्ष. घ्या नक्की. कारण हे तुमचेच पैसे आहेत. इथूनच लुटलेले आहे. त्यामुळे नक्की घ्या आणि मनसेच्या उमेदवाराला निवडून द्या’, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राची धुरा माझ्याकडे आली तर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही, तुटणार नाही. कुणीही दिल्लीत बसू दे. आपला अभिमान आपणच जगवला पाहिजे. कुणीही येतं आणि काहीही घेतंय. अदानी येतो विमानतळ घेतो, खार जमिनी घेतो. पोर्ट घेतो. आपल्याला काही पडली नाही. कोकणातील मोठी जमीन घेत आहे. हे सर्व उद्योगपती येणार… मी एक गोष्ट सांगतो. विश्वासाने सांगतो. तपासून पाहा. मी सतत सांगतो ना, जमिनी विकू नका. एकदा पायाखालची जमीन गेली तर तुमचं अस्तित्व राहणार नाही. गुजरातमध्ये पाहा. तिथला कायदा पाहा. शेतीची जमीन विकू शकत नाही. शेतीची जमीन विकायची असेल तर फक्त शेतकऱ्याला विकू शकता तीही राज्यातील. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतो. आपल्या माणसाचा विचार करतो. आपल्याकडेच फक्त प्रत्येक गोष्टीचा लिलाव केला जातो, असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.