राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत असेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, महाविकास आघाडीसोबत जाणार नाही. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपशीच आला. तर यंदा सरकार महायुतीचेच बनणार असून तीन महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर चित्र थोडं बदललं आहे. मात्र महायुतीला इतकं सोपही नाही. पण मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असेल. भाजपचा मुख्यमंत्री हा मनसेच्या साथीने होईल, असा विश्वास व्यक्त केला तर महाराष्ट्रातील राजकीय चिखलाला शरद पवार हे जबाबदार आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला. लोकसभेत शिंदेंनी मनसेला धनुष्यबाणावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र मी शिंदेंसारखं पक्ष किंवा चिन्ह ढापलं नाही, त्यामुळे नकार दिला. तर फोडाफोडी करून सत्तेत जाणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले.