‘हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच पॉडकास्टवरून संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर टीका करत निशाणा साधला आहे. बघा काय म्हणाले राज ठाकरे?
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार सण म्हणजे दसरा… या दिवशी विजया दशमी सणाच्या निमित्ताने आपण सर्वांना आपट्याची पानं देऊन एकमेकांना शुभेच्छा देत असतो. दरम्यान, विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच पॉडकास्टवरून राज ठाकरे यांनी संवाद साधला आहे. यामाध्यमातून राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राचं सोनं लुटलं जातंय आणि तुम्ही जाती-पातीत मश्गूल आहात.’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहिजे, असं वक्तव्य करत दसऱ्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी अवघ्या महाराष्ट्राला साद घातली आहे. तर आजचा दसरा खूप महत्त्वाचा आहे, बेसावध राहू नका, असं आवाहन देखील महाराष्ट्राच्या जनतेला राज ठाकरे यांनी दिलं आहे. ‘महाराष्ट्राचं सोनं तर गेले अनेक वर्ष लुटलं जातंय, आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटत आहोत. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही रहात नाही आणि बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत, पण आमचं दुर्लक्ष … आम्ही कधी आमच्या आयुष्यात मग्न तर कधी जाती-पातीमध्ये मश्गुल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी ? आजचा दसरा खूप महत्वाचा कारण तो निवडणुकीच्या तोंडावर आहे, अशावेळी बेसावध राहून चालणार नाही’, असे राज ठाकरे यांनी म्हटले.