जालना, ४ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात दाखल होत त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच टीकास्त्र सोडले. राज ठाकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे लोक फक्त तुमचा वापर करतील मतं पदरात पाडून घेतील आणि तुम्हाला विसरून जातील. कधी हे सत्तेत तर कधी हे विरोधी पक्षात, विरोधातले मोर्चे काढणार आणि हेच पुन्हा सत्तेत आले की गोळ्या झाडतात. पोलिस काय करणार, पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना ज्यांनी आदेश दिलेत त्यांना दोष द्या. ज्यांनी आदेश दिले असतील त्यांना मराठवाड्यात यायला बंदी घाला. झालेल्या प्रकाराची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मराठा समाजातील आंदोलकांना त्यांच्या वापर केला जात असल्याचे सांगत मी आज भाषण करायला नाही तर आवाहन करायला आलोय, असे राज ठाकरे यांनी सांगितले.