बाप्पाच्या हातून पृथ्वीवर मोदक पडला अन्…, नाशिकमध्ये असणाऱ्या मोदकेश्वर गणपतीची अख्यायिका माहितीये का?
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक हा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शहरात अनेक भागात पुरातन मंदिरे पाहायला मिळतात. त्यामध्ये काही गणपती मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिकच्या गोदा तीरावरील मोदकेश्वर गणपती बाप्पाचे मंदिर पाहायला मिळते. त्याचीही वेगळी अख्यायिका आहे.
नाशिकचा मोदकेश्वर गणपती हा नाशिकचं आराध्य दैवत आणि ग्रामदैवत मानले जाते. चक्क मोदकाचा आकार असलेला हा बाप्पा मोदकेश्वर गणपती म्हणून ओळखला जातो. आकाशातून भ्रमण करत असताना गणपती बाप्पाच्या हातून मोदक पृथ्वीवर पडला आणि त्या मोदकाने गणपती बाप्पाचा आकार घेतला, अशी या गणपती बाप्पाची आख्यायिका सांगितली जाते. नाशिकच्या गोदा नदीच्या तीरावरील मोदकेश्वर गणेशाचे मंदिर पाहायला मिळते. आजही हे मंदिर सुस्थितीत असून या मंदिराच्या स्थापनेचा निश्चित कालावधी नसला तरी साधारण या मंदिराला चारशे ते पाचशे वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. मोदकेश्वर बाप्पाचा दृष्टांत नाशिकमधील क्षेमकल्याणी घराण्यातील पूर्वजांना झाला आणि त्यांनी या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका मोदकेश्वर गणेशाची सांगितली जाते. इतकंच नाहीतर गणेशकोश, पंचवटी-यात्रा दर्शन, गोदावरी माहात्म्य यामध्ये मोदकेश्वर गणपतीचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 21 गणपती क्षेत्रांत मोदकेश्वर गणपतीची गणना होते.